नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पूर्ववैमनस्यातून मोटारसायकली पेटविण्याची धग नाशकात कायम असून, गुरूवारी (दि.३) मध्यरात्री एका समाजकंटकाने खोडसाळपणे नांदूनाका भागातील सर्व्हीस स्टेशनमध्ये लावलेल्या सात दुचाकी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्या. या घटनेत दुचाकींचे मोठे नुकसान झाले असून स्थानिकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळळा आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेम अशोक खलसे (रा.श्रीमंतयोगी सोसा.जत्रा नांदूररोड आडगाव) असे दुचाकी पेटविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत मिलींद हरिशचंद्र म्हस्के (रा.मखमलाबाद नाका) यांनी फिर्याद दिली आहे. म्हस्के यांचे जत्रा हॉटेल ते नांदूरनाका दरम्यानच्या मार्गावर मातोश्री अॅटोमोबाईल नावाचे मोटारसायकल गॅरेज व स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री संशयिताने पूर्ववैमनस्यातून दुरूस्तीसाठी गॅरेजच्या शेडमध्ये लावलेल्या दुचाकी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्या.
ही घटना सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाली असून या घटनेत सात मोटारसायंकलींचे मोठे नुकसान झाले आहे. दुचाकींनी पेट घेताच स्थानिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला असून या घटनेत सुमारे अडिच लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मयुर निकम करीत आहेत.