नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात वाहनचोरीची मालिका सुरू असून पार्क केलेल्या अॅटोरिक्षासह चोरट्यांनी वेगवेगळय़ा भागातून तीन मोटारसायकली चोरून नेल्या. याप्रकरणमी आडगाव सरकारवाडा व गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारकांकडून होवू लागली आहे.
मल्हारखान झोपडपट्टी भागात राहणारे अनिल शिवराम खोडे यांची अॅटोरिक्षा एमएच १५ एफयू ०७५८ गेल्या ७ मार्च रोजी अशोकस्तंभ परिसरातील काशिबा मेडिकल जवळ पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. तर मोटारसायकल चोरीचा पहिला प्रकार जिल्हा रूग्णालय आवारात घडला. अनिकेत प्रदिप कापडणीस (रा.आसखेडा ता. सटाणा) यांची प्लॅटीना मोटारसायकल (एमएच ४१ एएक्स २५६८) गेल्या २५ मार्च रोजी जिल्हा रूग्णालयाच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. दोन्ही गुह्यांबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार बागुल व गायकवाड करीत आहेत.
सचिन बाजीराव दाते (रा.रासबिहारी लिंकरोड, पंचवटी ) हे गेल्या २६ मार्च रोजी सय्यद पिंप्री रोडवरील हिंदूस्थाननगर भागात गेले होते. रस्त्याच्या कडेला पार्केली त्यांची एमएच १५ जीएस ८६९९ मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत. तर श्रीहरी शेखर रहाणे (रा. आॅस्ट्रीया कॉम्प्लेक्स सिक्स सिगमा हॉस्पिटल समोर महात्मानगर) यांची अॅक्टीव्हा एमएच १५ एफझेड ०१०४ गेल्या सोमवारी (दि.३१) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार पगार करीत आहेत.