नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात इंदिरानगर भागातील वेगवेगळया ठिकाणी राहणा-या दोन मुलीचा नुकताच विनयभंग करण्यात आला असून, त्यातील एका मुलीचा हॉटेलमधील वेटरने विनयभंग केला तर दुसरीचा इमारतीला पैश्यांचे आमिष दाखवून एकाने इमारतीच्या लिफ्टमध्ये विनयभंग केला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात विनयभंगासह पोस्को अन्वये वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत राहणारे एक कुटुंबिय शुक्रवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास परिसरातील एका हॉटेलध्ये जेवणासाठी गेले होते. लहान मुलगी त्रास देत असल्याने वेटर विष्णू हरगोविंद कुशवा (२५ मुळ रा.मध्यप्रदेश) याने तिला खेळण्यासाठी हॉटेल आवारातील गार्डनच्या झोक्याकडे नेले. या ठिकाणी मुलीच्या अज्ञानपणाचा लाभ उठवित त्याने विनयभंग केला. दुसरी घटना ज्ञानेश्वरनगर भागात घडली.
विकास कैलास बाविस्कर (२२ रा.नाशिकरोड) याने शुक्रवारी (दि.२७) सायंकाळी शाळेतून परतलेल्या मुलीस इमारतीच्या लिफ्टमध्ये गाठून दहा रूपयांचे आमिष दाखवित विनयभंग केला. दोन्ही घटनांप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास उपनिरक्षक डी.व्ही.पाटील व बारेला करीत आहेत.