नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- अवघ्या एक रुपयांवरुन पान टपरी व ग्राहकांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले व त्यात ग्राहकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. विशाल भालेराव असे मृत ग्राहकाचे नाव आहे. या घटनेनंतर अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सिडकोतील राजे संभाजी स्टेडियम जवळ घडली.
विशाल भालेराव हा बापू सोनवणेच्या पान टपरीवर सिगारेट घेण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याला सिगारेटची किंमत ११ रुपये अशी सांगण्यात आली. १० रुपयाची सिगारेट ११ रुपयांना का विकतो यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर या वादाचे पर्यवसन मारामारीत झाले. त्यामध्ये विशाल भालेरावच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला खासगी रुग्णालयात दाखल करुन उपचार करण्यात आले. त्यानंतर विशाल घरी आला आणि त्याचा मृत्यू झाला.
मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला की त्यामागे आणखी काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रेताचं शवविच्छेदन पूर्ण झाले असून त्याचा अहवाल आल्यानंतर खरे कारण समोर येईल असे पोलिसांनी सांगितले.