नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बसप्रवासात महिलेच्या लाखो रूपयांच्या अलंकारावर चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना नाशिक मुंबई दरम्यानच्या प्रवासात घडली. बॅगमध्ये ठेवलेला अलंकारांचा डबा चोरट्यानी चोरून नेला असून त्यात सुमारे १२ लाख १९ हजार रूपये किमतीचे दागिणे होते. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेवंती प्रकाश माहब्दी (रा. दहिसर मुंबई) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माहब्दी देवदर्शनानिमित्त शहरात आल्या होत्या. ९ मार्च रोजी सकाळी त्या वणी येथून देवदर्शन आटोपून महामार्ग बसस्थानकात दाखल झाल्या होत्या.
नाशिक मुंबई बस प्रवासात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बॅगेतील दागिणे असलेला स्टिलचा डबा हातोहात लांबविला. या डब्यात सुमारे १२ लाख १९ हजार रूपये किमतीचे अलंकार होते. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.