नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात चैनस्नॅचरांनी धुमाकूळ घातला असून शनिवारी (दि.३०) वेगवेगळया ठिकाणी तीन महिलांचे अंलकार भामट्यांनी ओरबाडून नेले. या घटनेत सुमारे दोन लाखाच्या दागिन्यांवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी आडगाव,गंगापूर व इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तपोनातील मनिषा दिलीप पवार (रा.केबडीबन डेंन्टल कॉलेज मागे) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, पवार व त्यांच्या आई विमल सांगलीकर या शनिवारी रात्री तपोवनाताली स्वामी नारायण मंदिरात देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून मायलेकी आपल्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. विवीयाना सोसायटी जवळून दोन्ही मायलेकी पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या एका तरूणाने सांगलीकर यांच्या गळयातील सुमारे ९४ हजार ५०० रूपये किमतीची सोनसाखळी व जोंधळ पोत हिसकावून कन्नमवार पुलाखाली उभ्या असलेल्या दुचाकीस्वार जोडीदाराच्या दिशेने पोबारा केला. यानंतर दोघे भामटे अमरधामकडे जाणा-या मार्गाने पसार झाले असून याप्रकरणी मनिषा पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
दुसरी घटना गंगापूररोडवरील शांतीनिकेतन चौकात घडली. कविता राजीव आबड (रा.ऋषीराज होरायझन,प्रसाद मंगल कार्यालयाजवळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आबड या शनिवारी सायंकाळच्या वेळेस आपल्या लहानग्या नातूस सोबत घेत परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेल्या होत्या. आजी आणि नातू फेरफटका मारून घराकडे पायी जात असतांना शांतीनिकेतन चौकातील अपोलो मेडिकल स्टोअर्स समोर दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी आबड यांच्या गळयातील सुमारे ५५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हिसकावून नेली. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
तिसरी घटना इंदिरानगर भागात घडली. गोकर्णा वैजिनाथ कदम (रा. राजसारथी सोसा.) यांनी फिर्याद दिली आहे. कदम या शनिवारी रात्री मुलगा व सासू सोबत घेवून चंदा हार्डवेअर दुकान परिसरात गेल्या होत्या. काम आटोपून सर्वजण रस्त्याने पायी आपल्या घराकडे जात असतांना ही घटना घडली. वनसंपदा सोसायटी परिसरातील गार्डन जवळील रोहिणी हाईटस बिल्डींग समोरील चौफुलीवर दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने कदम यांच्या गळय़ा्तील सुमारे ६० हजार रूपये किमतीची सोन्याची पट्टीपोत हिसकावून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार महाजन करीत आहेत.
……..