नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नव्याने सुरू असलेल्या बांधकाम साईटवरून पडल्याने ३४ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. तीस-या मजल्यावरून पडल्याने गेल्या तीन महिन्यापासून कामगारावर उपचार सुरू होते. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कनसिंह सरदार बारेला उर्फ कनसिंग हरदास बरडे (मुळ रा.मध्यप्रदेश हल्ली सितागुंफाजवळ पुणे विद्यार्थी वसतीगृह बांधकाम साईटवर) असे मृत कामगाराचे नाव आहे.
कनसिंह सितागुंफा परिसरातील पुणे विद्यार्थी वसतीगृह बांधकाम साईटवर कामास होता. ९ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास तो तिस-या मजल्यावर बांधकामास पाणी मारत असतांना ही घटना घडली होती. अचानक तोल गेल्याने तो जमिनीवर कोसळला होता. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यास अपोलो त्यानंतर शताब्दी व आडगाव मेडिकल कॉलेज येथे उपचारार्थ हलविण्यात आले होते.
महिनाभराच्या उपचारानंतरही त्याच्या प्रकृर्तीत सुधारणा न झाल्याने त्यास अधिक उपचारार्थ इंदोर येथील एमवायएच हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता २४ फेब्रवारी रोजी रात्री उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत संयोगितागंज पोलीसांच्या वतीने खबर देण्यात आल्याने याबाबत पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार खाजेकर करीत आहेत.