नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गर्दीची संधी साधत चोरट्यानी एका महिलेच्या पर्स मधील दहा हजाराची रोकड हातोहात लांबविली. ही घटना वर्दळीच्या शालिमार भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चैताली ललीतकुमार पाटील (रा.धुळे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील बुधवारी (दि.२६) शहरात आल्या होत्या. खरेदीसाठी त्या शालिमार भागात गेल्या असता ही घटना घडली. शालीमार परिसरात एका हातगाडीवर ते कानातले टॉप्स बघत असतांना अज्ञात चोरट्याने गर्दीची संधी साधत त्यांची पर्स उघडून रोकड चोरून नेली. अधिक तपास हवालदार बोंबले करीत आहेत.
वृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वारांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्याने पायी घराकडे जाणा-या वृध्द महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेली. ही घटना राजीवनगर भागात घडली. या घटनेत पोत व ठुसी असे सुमारे २४ हजाराचे अलंकार भामटयांनी पळविले असून याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंधू केशव जगताप (७५ रा.गणेश कॉलनी,किशोर नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जगताप मंगळवारी (दि.२४) रात्री हातात बांगड्या भरण्यासाठी राजीवनगर भागात गेल्या होत्या. बांगड्यांचे दुकान बंद असल्याने त्या घराकडे परतत असतांना ही घटना घडली. श्लोक मेडिकल स्टोअरर्स समोरून त्या पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील ठुसी व सोन्याची पोत असा सुमारे २४ हजाराचा ऐवज हिसकावून नेला. अधिक तपास हवालदार डोळस करीत आहेत.