नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)-पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी वृध्देच्या दागिन्यांवर डल्ला मारला. ही घटना चेतनानगर येथील सेंट फ्रान्सिस स्कूल भागात घडली असून यात सव्वा लाख रूपये किमतीचे अलंकार मदतीच्या बहाण्याने हातोहात लांबविले. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छायाताई अरविंद देशमुख (६५ रा.कृष्णाई गॅलेक्सी,कृष्णाईनगर चेतनानगर) यानी याबाबत फिर्याद दिली आहे. देशमुख मंगळवारी (दि.२१) दुपारी सेंट फ्रान्सिस स्कूल भागात गेल्या होत्या. घराकडे परतत असतांना लोटस हाऊस येथील एका झाडाखाली त्या थांबल्या असता ही घटना घडली. दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांना गाठत पोलीस असल्याची बतावणी केली. यावेळी दोघांना परिसरात एका महिलेचा गळा चिरून चोरट्यांनी दागिणे पळवून नेल्याचे सांगत ही फसवणुक केली. भामट्यांनी देशमुख यांना अंगावरील दागिणे काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीचा बहाणा करून त्यांच्या गळय़ा्तील सोन्याचा गोफ, अंगठी व दोन बांगड्या असा सुमारे सव्वा लाखाचे अलंकाप हातोहात लांबविले असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
घरफोडीत चोरट्यांनी ३५ हजाराच्या ऐवजावर डल्ला
नाशिक(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- जाधव संकुल भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ३५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात लॅपटॉप,मोबाईल व महत्वाच्या कागदपत्राचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल प्रदिप ठोसर (रा.सोनाई सोसा.जाधव संकुल) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ठोसर रविवारी (दि.२३) सकाळी नेहमी प्रमाणे आपल्या कामावर गेले असता ही घरफोडी झाली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील लॅपटॉप,मोबाईल व महत्वाचे कागदपत्र असा सुमारे ३५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास हवालदार सुर्यवंशी करीत आहेत.