नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शाळेतून घराकडे रस्त्याने पायी जाणा-या चौदा वर्षीय मुलीची वाट अडवित रिक्षातून आलेल्या भामट्यांनी विनयभंग केल्याची घटना नेहरू गार्डन भागात घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलगी सोमवारी (दि.२४) दुपारी सीबीएस परिसरातील शाळेतून आपल्या चुलत्याच्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. रिक्षातून आलेल्या दोघांनी तिचा पाठलाग केला. नेहरू गार्डन परिसरात वाट अडवित संशयितांपैकी एकाने तिच्याकडून पेन घेऊन मोबाईल नंबर असलेली चिठ्ठी तिला देण्याचा प्रयत्न केला.
पीडित विद्यार्थींनीने चिठ्ठी घेण्यास नकार दिल्याने रिक्षातील दुस-या संशयिताने त्याच्याकडील मोबाईलमध्ये पीडित मुलीचे छायाचित्र काढला. ही बाब मुलीने पालकांसह शिक्षकांकडे कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक सपकाळे करीत आहेत.
सोनसाखळी चोरट्यांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– गर्दीची संधी साधत बसमध्ये चढणा-या प्रवाश्याच्या गळयातील सोनसाखळी चोरट्यांनी हातोहात लांबविला. ही घटना महामार्ग बसस्थानकात घडली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन लक्ष्मण वाघचौरे (रा.दत्तचौक,सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. वाघचौरे दाम्पत्य गेल्या शनिवारी (दि.१५) कल्याण येथे जाण्यासाठी महामार्ग बसस्थानकात गेले होते. नाशिक कल्याण बसमध्ये चढत असतांना ही घटना घडली. गर्दीची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी वाघचौरे यांच्या गळयातील सोन्याचा गोफ हातोहात लांबविला. अधिक तपास हवालदार भिल करीत आहेत.