नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बंगल्याच्या पाय-यांवर पाय घसरून पडल्याने ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना जेलरोड येथील चंपानगरी भागातील घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रमेश धोंडीराम उबाळे (रा.सृष्टी बंगला,चंपानगरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. उबाळे रविवारी (दि.२३) रात्री अचानक आपल्या राहत्या बंगल्यात पडले होते. पायरीवर पाय घसरल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. भाचा विशाल उबाळे याने तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना मध्यरात्री डॉ. सुरेश पवार यांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
तडिपारास पोलीसांनी ठोकल्या बेड्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हद्दपारीची कारवाई करूनही शहरात राजरोस वावरणा-या तडिपारास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई बिडीकामगारनगर भागात करण्यात आली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल सोमनाथ जगळे (३२ रा. बिडीकामगारनगर,अमृतधाम ) असे संशयित तडिपाराचे नाव आहे. जगळे याच्या गुन्हेगारी कारवायांच्या पार्श्वभूमिवर शहर पोलीसानी त्याच्याविरूध्द हद्दपारीची कारवाई केलेली आहे. शहर आणि जिल्यातून त्यास एक वर्षासाठी तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना शनिवारी (दि.२२) रात्री तो मिथील प्राईड हॉटेल कडून बिडीकामगारनगर कडे जाणा-या मार्गावर मिळून आला.
याबाबत अंमलदार सचिन सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस दप्तरी गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाघ करीत आहेत.