नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असून नुकत्याच तीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यात पंचवटीतील शाळकरी दोघी मैत्रीणींसह सिडकोतील मुलीचा समावेश आहे. संबधीत मुलींचे कुणी तरी अपहरण केल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने याप्रकरणी पंचवटी आणि अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरीरोड भागात राहणा-या दोन मुली बुधवारी (दि.२५) आपल्या शाळेत गेल्या होत्या. याबाबत त्यांनी घरी चित्रकलेचा पेपर असून सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत घरी येण्याची ग्वाही दिली होती. मात्र त्या अद्याप परतल्या नाही. कुटुंबियांनी शोधाशोध केली असता एकाच शाळेत असलेल्या दोन मैत्रीणी गायब असल्याचे समोर आले असून शिक्षकांनी दोन्ही मैत्रीणी शाळेत आल्या नसल्याचा खुलासा केल्याने पालकांनी पोलीसात धाव घेतली आहे. सदर मुलींना कुणी तरी काही तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बापू रायकर करीत आहेत.
दुसरी घटना अंबड औद्योगीक वसाहतीत घडली. सिडकोतील अल्पवयीन मुलगी गुरूवारी (दि.२६) दुपारपासून बेपत्ता आहे. तिला कुणी तरी पळवून नेल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून तिच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक किरण शेवाळे करीत आहेत.