नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सामाईक मिळकतीमधील एकाचा हिस्सा खरेदी करणे एका वृध्दास चांगलेच महागात पडले आहे. मुळ मालकांच्या वारसदाराकडून कोर्ट कचेरीच्या नावाखाली नाहक त्रास दिला जात असून वेळोवेळी खंडणी वसूल केली जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. संशयिताने उपविभागीय कार्यालयात तारखेस उपस्थित राहिलेल्या वृध्दाकडे पुन्हा २५ लाखाच्या खंडणीची मागणी करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदिप चंद्रकांत गांगुर्डे व अन्य अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत शिवदास निंबा ठाणकर (७२ रा.दत्तनगर,पेठरोड) यांनी फिर्याद दिली आहे. ठाणकर यांनी सामाईक मिळकतीमधील दादा रामजी काळे व त्यांच्या अन्य नातेवाईकांकडून त्यांच्या हिस्याची मिळकत खरेदी केलेली आहे. मात्र संशयिताकडून या व्यवहारापूर्वीचे म्हणजे २०१३ पूवीच्या सातबारा उता-याच्या आधारे नाहक त्रास दिला जात असल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. सात बारा उता-यावर संशयिताची आई उषा चंद्रकांत गांगुर्डे यांची वारसहक्कानुसार नोंद होती. या सातबारा उता-याच्या आधारे संशयिताने ठाणकर यांच्या मिळकत मधील जमिन विक्री व्यवहारात हरकत घेत व हरकतीची भिती दाखवत ब्लॅकमेल केले.
२०१८ मध्ये वेगवेगळया धमक्या देवून संशयिताने साडे सहा लाख रूपयांची खंडणी उकळली. एवढ्यावरच न थांबता संशयिताने ठाणकर यांच्या जमिनीसंबधीच्या फेरफार नोंदी आधारे महसूली अपील दाखल केले. ही बाब न्यायप्रविष्ठ असून उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात त्यावर सुनावणी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी ठाणकर तारखेचे काम आटोपून उपविभागीय कार्यालया बाहेर येत असतांना त्यांना संशयिताने गाठले. यावेळी संशयिताने शिवीगाळ करीत पुढील तारखेपर्यंत २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. यावेळी त्याने मुलास जीवे ठार मारण्याबरोबरच त्याला मर्डर केस मध्ये अडकवून तारखेस येवू देणार नाही अशी धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास निरीक्षक चव्हाण करीत आहेत.