नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात असून वेगवेगळया भागात झालेल्या दोन घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा दोन लाखाच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात सिन्नर फाटा येथे भरदिवसा झालेल्या घरफोडीचा समावेश आहे. याप्रकरणी पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कैलास मेसू भालेराव (रा.शर्मा मळा,पंचवटी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भालेराव कुटुंबिय रविवारी (दि.१६) बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटात ठेवलेली ५० हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ३७ हजार ७०० रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार जाधव करीत आहेत.
दुसरा घरफोडीचा प्रकार सिन्नर फाटा भागात घडला. इमरान रहेमान खान (४४ रा. श्रीपुजा अपा.सिन्नरफाटा) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. खान कुटूंबिय सोमवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली ३३ हजाराची रोकड व सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ९९ हजार ५७८ रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक मोरे करीत आहेत.