नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– रंगपचमीच्या उत्साहात चोरट्यांनीही दिवाळी साजरी केली. ढोलताश्याच्या गजर आणि संगिताच्या कारंजावर पाण्यात थिरकणा-या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्रासह वेगवेगळया भागात जल्लोष साजरा करणा-या नागरीकांच्या मोबाईलवर भामट्यांनी डल्ला मारला. पार्क केलेली वाहन व दुचाकीना लक्ष करीत चोरट्यांनी डिक्कीत ठेवलेले ऐवज पळविला. चोरीच्या सर्वाधीक घटना पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत घडल्या आहेत.
जेलरोड येथील दिव्या तुषार सोनार (रा.हनुमंत लोखडे मळा) या रंगपंचमीनिमित्त बुधवारी (दि.१९) गोदाघाटावर गेल्या होत्या. रामकुंड परिसरात त्या रंगपंचमी उत्साहात सहभागी झाल्या असता ही घटना घडली. कुंडातील पाण्यात डुबकी मारत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळयातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र हातोहात लांबविले. तर याच भागातील वाहनतळावर आपली वाहने पार्क करून रंगपंचमी साजरी करण्यासाठी ठिकठिकाणी गेलेल्या नागरीकांच्या वाहनांनाही चोरट्यांनी लक्ष केले.
दुचाकीच्या डिक्या फोडून भामट्यांनी मोबाईलसह डिक्कीतीवर एेवजावर डल्ला मारला. याबाबत अकरा जणांचे मोबाईल तर महिलेने मंगळसूत्र लंपास झाल्याप्रकरणी पोलीसात धाव घेतली असून, याबाबत परशराम कैलास भोये (रा.भगूर ता.जि.नाशिक) या युवकाने फिर्याद दिली आहे. अधिक तपास हवालदार मालसाने करीत आहेत.