नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– प्लॉट खरेदी विक्रीत गुंतवणुक केल्यास अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी एका वृध्दास ३० लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. तीन – साडे तीन वर्ष उलटूनही गुंतवणुक व परताव्याची रक्कम पदरात न पडल्याने पोलीसात धाव घेतली असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भालचंद्र खानकरी व संजय भालचंद्र खानकरी (रा.दोघे गोविंदनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याप्रकरणी सुभाषचंद्र निळकंठ देशमुख (६२ रा.प्रकाश पेट्रोल पंपा मागे,गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. देशमुख व खानकरी बंधू एकमेकांचे परिचीत असून त्यांच्यात जुनी ओळख आहे. खानकरी बंधूचे गोविंदनगर येथील विश्वास बँक भागात बी.के.डेव्हलपर्स नावाचे कार्यालय आहे.
सन.२०२२ मध्ये देशमुख यांची अचानक भेट झाल्याने संशयितांनी त्यांना आपल्या कार्यालयात नेले होते. या ठिकाणी प्लॉट खरेदी विक्री व्यवसायात मोठा नफा मिळत असल्याचे सांगण्यात आल्याने देशमुख संशयितांच्या भूलथापांना बळी पडले. अल्पावधीत मोठा मोबदला मिळणार असल्याने त्यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ दरम्यान गुंतवणुक म्हणून संशयिताकडे ३० लाख रूपयांची रक्कम सुपूर्द केली. मात्र तीन – साडे तीन वर्ष उलटूनही संशयितांनी देशमुख यांना एक रूपयाही दिली नाही. उलट देशमुख यांनी तगादा लावला असता त्यांनी टाळाटाळ केल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेख करीत आहेत.