नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रकचालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नो एन्ट्री वाहन टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी दंड आकारल्याच्या रागातून ही शिवीगाळ व मारहाण ट्रकचालकाने केली.
पीबी ०५ एएम १४९० या क्रमांकाच्या ट्रकवरील चालक परगत किरपाल सिंग व ट्रक क्लिनर मनप्रीत सिंग गिदर सिंग (दोघेही रा. राजस्थान) यांनी त्यांच्या ताब्यातील वाहन नो एन्ट्रीमध्ये घातले. त्यानंतर शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अल्लाउद्दीन लतीफ शेख व त्यांच्यासोबतचे दोन पोलीस अंमलदार द्वारका सर्कल येथे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्या वाहनाला अडवून शेख यांनी दंड आकारला. याचा राग आल्याने ट्रकचालक परगतसिंग याने हा ट्रक उड्डाणपुलाच्या खाली मुख्य रस्त्यावर धोकादायक रीतीने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला.
त्यावेळी हा ट्रक त्याला बाजूला घेण्यास सांगितले असता ट्रकचालकाने शेख यांच्या छातीवर बुक्का मारून दुखापत केली. तसेच इतर दोन पोलीस सहकार्यांना शिवीगाळ केली. यानंतर वाहतुकीस अडथळा निर्माण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात ट्रकचालकासह क्लिनरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ करीत आहेत.