नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकीस्वारास बेदम मारहाण करून खिशातील रोकडसह मोबाईल बळजबरीने हिसकावून नेणा-या दोघांना पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही घटना सिडकोतील दत्तचौक भागात घडली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल काशीनाथ शेळके (३८ रा. मल्हारखान झोपडपट्टी गंगापुर रोड ) व रमजान राजु शेख (२५ रा. अजमेरी मस्जिद शिवाजी चौक भद्रकाली जुने नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत साईप्रसाद अनिल पाटिल (३४ रा. सहयाद्री नगर सिडको) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील शनिवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास सिडकोतील विजयनगर कडुन चांडक सर्कलच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असताना ही घटना घडली.
दत्त चौक सिडको येथिल महावितरण कार्यालयासमोर दोघा संशयितांनी दुचाकी अडवित पाटील यांना दुचाकीवरून खाली खेचत लाथाबुक्यानी बेदम मारहाण केली. यावेळी संशयितांनी खिशामध्ये पैसे व मोबाईल गुपचुप काढुन दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत पाटील यांच्या खिशातील २०० रूपयांची रोकड व मोबाईल बळजबरीने काढून घेत पोबारा केला. पाटील यांनी स्व:ताला सावरत तात्काळ अंबड पोलीस ठाणे गाठल्याने संशयितांना बेड्या ठोकण्यात यश आले असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक किरण रौंदळे करीत आहेत.