नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– धक्का लागल्याच्या वादातून कारची काच फोडणा-या रिक्षाचालकास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. हा राडा शालिमार चौकात झाला होता. दुस-या दिवशी याचे पडसाद सोशल मीडियावर उमटल्याने पोलीसांनी स्व:ता फिर्यादी होत गुन्हा दाखल केला केला असून मग्रुर रिक्षाचालकास बेड्या ठोकल्या आहेत. संशयित रिक्षाचालकाचा साथीदार पसार झाला असून त्याचा शोध भद्रकाली पोलीस घेत आहेत.
मजहर अन्वर खान (रा.कथडा जुने नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत हवालदार विक्रांत मगर यांनी फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. १४) दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. देवळाली कँम्प येथील स्विफ्ट कारचालक (डीएल १२ सीएन २८२३) हा कालिदास कला मंदिराकडून शालिमार चौकाच्या दिशेने आपले वाहन घेवून जात होता. त्याचवेळी शालिमार चौकातील शिवसेना कार्यालयाच्या बाहेर असलेल्या गर्दीत या कारचा किरकोळ धक्का एमएच १५ जेए ३५०४ या रिक्षास लागला. त्यामुळे रिक्षा बाहेर आलेल्या मजहर खान या चालकाने कारचालकास अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. यानंतर आजूबाजूचे काही रिक्षाचालक एकत्र जमले. त्यातील मजहर खान याच्या साथीदाराने कल्लोळ माजविला. मजहर खानच्या अश्लिल शिवागाळ आणि दमदाटीने कारचालक तरुण पुरता घाबरला. तो आणि कारमधील महिला जीवाच्या आकांताने माफी मागून विनवणी करत होती. त्याबाबत कोणताही माणुसकी भाव न दाखविता मजहरने कारमधील सर्वांना शिवीगाळ करुन कारची काच फोडली.
दरम्यान, या संपूर्ण लाईव्ह घटनेचा व्हिडीओ काहींनी चित्रित केला. तो दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी (दि.१५) विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. हा व्हिडीओ झळकताच शेकडो नेटक-यांनी टवाळखोर रिक्षाचालकाच्या कृतीवर संताप व्यक्त करुन त्याला शिव्यांची लाखोली वाहिली. दरम्यान, भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी या घटनेची दखल घेत तत्काळ सहायक निरीक्षक वसंत पवार व पथकास कारवाईचे आदेश दिले. यानंतर पवार यांच्या पथकाने मग्रूर रिक्षाचालक अन्वर यास रिक्षासह ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. त्याला अटक करण्यात आली असून सखोल चौकशी केली जात आहे. तसेच मजहरच्या साथीदाराचा शोध सुरु आहे.