नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात महिला मुलींवर अत्याचार वाढले असून विनयभंगाच्या चार घटना घडल्या आहे. विनयभंगाची पहिली घटना मखमलबादरोड भागात घडली. होळी सण साजरा करीत असलेल्या अल्पवयीन मुलीस आपल्या आईने बोलावल्याचे खोटे सांगून शेजारी राहणा-या १५ वर्षीय मुलाने तिचा विनयभंग केला. मखमलाबादरोड भागात राहणा-या पीडितेच्या आईने याबाबत फिर्याद दिली आहे. पीडितेचे कुटुंबिय होळी सण साजरा करीत असतांना शेजारी राहणा-या संशयिताने मुलीस आपल्या आईने बोलावल्याचे खोटे सांगून सोबत घेवून गेला. यावेळी एका घरात ढकलून देत त्याने विनयभंग केला. याप्रसंगी मुलीने त्याच्या कानशिलेत लगावली असता त्यानेही मुलीस मारहाण केली. मुलीने घरी जावून आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक रायकर करीत आहेत.
दुसरी घटना औद्योगीक वसाहतीतील संजीवनगर भागात घडली. परप्रांतीय महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. लाल यादव (३५ रा. अंबड) नामक परिचीताने धुळवडची संधी साधत महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला. कलरची अॅलर्जी असल्याचे सांगूनही संशयिताने रंग लावण्याच्या बहाण्याने अंगावर बसून हे कृत्य केले. महिलेने विरोध केला असता संशयिताने मारहाण केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला आहे.
तर तिसरी घटना अंबड एमआयडीसीत घडली. पीडीत अल्पवयीन मुलगी व तिची आई गुरूवारी (दि.१३) परिसरात होळी सणाचा उत्सव बघण्यासाठी गेल्या होत्या. रात्री दहाच्या सुमारास मायलेकी घराकडे परतत असतांना ही घटना घडली. आई पुढे चालत असतांना पाठीमागून येणा-या मुलीस रवी लोखंडे व अरूण खंदारे या संशयितांनी गाठले. सुनसान रस्ता असल्याची संधी साधत संशयितांनी मुलीस जवळच राहणा-या संघर्ष वंजारी याच्या घरात ओढून नेले. या ठिकाणी लोखंडे याने मुलीचा विनयभंग केला तर दुस-या संशयिताने घराचा दरवाजा लावून घेतला होता. वरिल दोन्ही घटनांप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास हवालदार सावळे व सहाय्यक निरीक्षक दिलीप भंदे करीत आहेत.
चौथी फिर्याद चेतनानगर भागात राहणा-या मुलीने दिली आहे. केदार दुकळे (रा.जळगाव निमतेज ता.मालेगाव) हा युवक सन. २०२३ पासून तिचा पाठलाग करीत असून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने विनयभंग केला आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.