नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- साडी विक्री दुकानदाराचे लक्ष विचलीत करून गल्ल्यातील रोकड पळविणा-या बंटी बबली पोलीसांच्या जाळयात अडकली आहे. शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने या दुकलीस हुडकून काढत बेड्या ठोकल्या असून त्यांच्या ताब्यातून १ लाख १० हजाराची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. संशयितांना मुद्देमालासह भद्रकाली पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
वेलसन उर्फ लकी प्रेमविलास मोहिते (३५) व पल्लवी शितल वाईकर (३५ रा.रिव्हेली अपा.रथचक्र चौक,इंदिरानगर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित बंटी बबलीचे नाव आहे. याबाबत चेतन पृथ्वीराज बेदमुथा (रा.लामखेडमळा,तारवालानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बेदमुथा यांचे दहिपूल परिसरात दर्पण साडीज नावाचे दुकान आहे. गेल्या मंगळवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास अनोळखी दांम्पत्य साडी खरेदीसाठी दुकानात आले होते. बेदमुथा हे साड्या दाखवित असतांना संशयितांनी त्यांना बोलण्यात गुंतवून गल्यातील रोकड हातोहात लांबविली होती. याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भद्रकाली पोलीस त्यांचा शोध घेत असतांना युनिट १ चे हवालदार प्रशांत मरकड व संदिप भांड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित जोडप्यास हुडकून काढण्यात पोलीसांना यश आले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संशयितांचे घर गाठून पथकाने उलट तपासणी केली असता संशयितांनी गुन्हयाची कबुली देत मुद्देमाल काढून दिला असून दोघांना भद्रकाली पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदाम सांगळे,रविंद्र बागुल,हवालदार प्रशांत मरकड,सदिप भांड,प्रदिप म्हसदे,प्रविण वाघमारे,रमेश कोळी,विशाल काठे नाझीमखान पठाण अंमलदार जगेश्वर बोरसे,अमोल कोष्टी अनुजा येलवे व मनिषा सरोदे आदींच्या पथकाने केली.