नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- फोन लावायचा बहाणा करून भामट्यानी रिक्षाचालकासह एकाचा मोबाईल पळविला. वेगवेगळया भागात या घटना घडल्या असून याप्रकरणी भद्रकाली व सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोबाईल पळविल्याची पहिली घटना काठे गल्लीत घडली. याबाबत नंदू बहिरू शिंदे (रा. शंकरनगर टाकळीरोड) या रिक्षाचालकाने याबाबत फिर्याद दिली आहे. शिंदे गेल्या २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास शंकरनगर येथे आपली रिक्षा पार्क करून प्रवाश्यांची प्रतिक्षा करीत असतांना त्यांना एका दुचाकीस्वार भामट्याने गाठले. सिंगापूर गार्डन येथून माझ्या फॅमिलीला नवश्या गणपती येथे सोडायचे आहे. असे म्हणत त्याने कुटूंबियांना फोन लावण्यासाठी शिंदे यांचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला. बॅलन्स नसल्याचा त्याने बहाणा केला होता. भामट्याने मोबाईलवर बोलण्याच्या नादात शिंदे यांचे लक्ष विचलीत करून सुमारे १५ हजार रूपये किमतीचा मोबाईल घेवून पोबारा केला असून याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार बाविस्कर करीत आहेत.
असाच प्रकार मनिशंकर हॉस्पिटल भागात घडला. रामभाऊ विश्वनाथ उके (रा.सिंहस्थनगर सिडको) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. उके मनिशंकर हॉस्पिटल परिसरातून जात असतांना एकाने फोन लावण्यासाठी त्यांचा मोबाईल घेतला. फोन लावून बोलत असतांना उके यांचे लक्ष नसल्याची संधी साधत भामट्याने धुम ठोकली. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक टिपरे करीत आहेत.