नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वाहनाची काच फोडली या वादातून टोळक्याने एका घरात घुसून धुडघूस घातल्याची घटना फुलेनगर येथे घडली. या घटनेत चार जणांच्या टोळक्याने मध्यरात्री बेकायदा घरात प्रवेश करून महिलेच्या घरात तोडफोड केली असून या घटनेत संसारोपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्की वाघ व त्याचे अनोळखी तीन साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत शोभा संतोष मिरके (३५ रा.विजय चौक,फुलेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. मिरके दांम्पत्य शुक्रवारी (दि.१४) रात्री झोपी गेले असता मध्यरात्री टोळक्याने बेकायदा प्रवेश केला. यावेळी संतप्त टोळक्याने तुमचा मुलगा प्रेम कुठे आहे. त्याने आमच्या गाडीची काच फोडली असा आरोप करीत संशयितांनी शिवीगाळ करीत घरातील वस्तूंची तोडफोड केली.
या घटनेत काही तरी वस्तूने टोळक्याने घरातील शोकेष, टिव्ही फोडत संसारपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान केले. या टोळक्याने मुलगा प्रेम यास जास्त झाले असून त्याला बघून घेवू अशी धमकी देत पोबारा केला. अधिक तपास हवालदार किरण सानप करीत आहेत.