नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बहुचर्चित खासगी सावकार वैभव देवरे व त्याच्या टोळीच्या पोलीसांनी फास आवळला आहे. खोट्या तक्रारी,जीवे मारण्याच्या धमक्या जमिन खरेदी विक्रीतील गैरव्यवहार फसवणुक, सावकारीसह तत्सम १५ हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या या टोळीवर अखेर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. आर्थीक फायद्यासाठी ही टोळी एकट्याने किवा संघटीत पणे लोकामध्ये दहशत निर्माण करीत होती.
वैभव यादवराव देवरे, गोविंद पांडूरंग ससाणे, सोनल वैभव देवरे, निखील नामदेव पवार अशी मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या देवरे टोळीतील सदस्यांची नावे आहेत. या टोळी हिरावाडी येथील जमिनीचे बनावट कादरपत्र तयार करून ते खरे असल्याचे भासवून तसेच मौजे सारूळ येथील जमिनीचा व्यवहार अनेक लोकांसोबत केलेला असतांना देखील दोन्ही जमिनींचा व्यवहार केला. आर्थीक फसवणुकीच्या उद्देशाने ३ कोटी ५ लाख रूपयांमध्ये हा व्यवहार करून एका कडून ६३ लाख ४९ हजाराचे टोकन घेतले. या काळात सावकारी व्यवसायासाठी ३५ लाख रूपये बळजबरीने सोनल देवरे हिच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले मात्र तरीही जमिन नावावर करून दिली नाही. तक्रारदाराने पैसे परत मागितले असता टाळाटाळ करण्यात आली. त्यानतर थेट विनयभंगाचा खोटा गु्न्हा व जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या तपासात आर्थीक फसवणुकीसाठी संघटीतपणे हा गुन्हा केल्याचे समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच संशयितांनी इंदिरानगर,अंबड,गंगापूरसह मुंबईनाका परिसरात लोकांची फसवणुक करून अवैध सावकारी व्यवसाय केल्याचे पुढे आले आहे. व्याजापोटी अवाजवी रकमा वसली करणे दमदाटी जीवे मारण्याच्या धमकी देणे खुनाचा प्रयत्न विनयभंग जबरीचोरी खंडणी सारखे गंभीर गुन्हे करून या टोळीने दहशत निर्माण केली होती. टोळीचा म्होरक्या वैभव देवरे याने गुन्हा करतांना टोळीतील सदस्यांच्या सहाय्याने संयुक्तपणे धाकदडपशा दाखवून लोकांची फसवणुक करून गुन्हेगारी कृत्य सुरूच ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. संबधीतावर इंदिरानगर,अंबड, मुंबईनाका व गंगापूर पोलीस ठाण्यात १५ हून अधिक गुन्हे दाखल असून त्यांनी कट रचून हे कृत्य केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमि लक्षात घेवून पोलीस आयुक्तांच्या आदेशाने या मोक्कान्वये कारवाईवर शिक्का मोर्तब करण्यात आले आहे.