नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात बुधवारी वेगवेगळया भागात राहणा-या तरूणीसह दोघांनी गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. तिघांच्याही आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत म्हसरूळ व सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयुर शिवाजी लगरे (३२ रा.रेणूका अपा. गजपंथ सोसा.समोर म्हसरूळ) या युवकाने बुधवारी दुपारच्या सुमारास अज्ञात कारणातून म्हसरूळ आडगाव मार्गावरील सबस्टेशनच्या पाठीमागे चिंचेच्या झाडास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत वडिल शिवाजी लगरे यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गोसावी करीत आहेत.
दुस-या घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडल्या. मोहित शांताराम पाटील (२५ रा.रामरेशभाई निवास,महादेवमंदिराजवळ) या युवकाने बुधवारी सायंकाळी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच घरमालक भगवान खैरणार यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत सरकारवाडाचे अंमलदार शरद पवार यांनी खबर दिली आहे.
तिसरी घटना याच भागातील सातमाऊली चौकात घडली. प्रणाली संतोष पाळदे (२४ रा.शक्ती रो हाऊस) या तरूणीने बुधवारी आपल्या राहत्या घरात पंख्यास गळफास लावून घेतला होता. मामा दिपक जाधव यांनी तिला तातडीने जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. दोन्ही घटनांबाबत सातपूर पोलीस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या असून अधिक तपास हवालदार केदारे व सुर्यवंशी करीत आहेत.