नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– राज्य उत्पादन शुल्क विभागास केंद्र शासित प्रदेशातील बेकायदा दारूची वाहतूक रोखण्यात यश आले आहे. स्कार्पिओ चालकास बेड्या ठोकत पथकाने वाहनांसह सुमारे साडे नऊ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत सदर वाहन चालकास कव्हर देणारा दुचाकीस्वार मात्र आपली मोटारसायक सोडून पसार झाला आहे. या कारवाईने मात्र केंद्रशासित दादरा नगर हवेली व दिव दमन येथील दारूची राज्यात राजरोस विक्री होत असल्याचे पुन्हा सिध्द झाले आहे. ही कारवाई एक्साईजच्या ड विभाग पथकाने केली.
अरूण अशोक धनगर (२५ रा.त्र्यंबकेश्वर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या स्कार्पिओ चालकाचे नाव आहे. होळी सणाच्या पार्श्वभूमिवर एक्साईज विभागाच्या वतीने समिवर्ती चेक नाके सर्किय करण्यात आले आहे. ड विभाग भरारी पथक गुरूवारी (दि.१३) पहाटे ओझरखेड हरसूल मार्गावरील देवडोगरा चेकपोस्टवर वाहन तपासणी करीत असताना बेकायदा दारूसाठा पथकाच्या हाती लागला. भरधाव येणारी एमएच ०६ एएस ९९०४ अडवून पथकाने तपासणी केली असता त्यात बिअर आणि विदेशी मद्याचा साठा आढळून आला.
या कारवाई दरम्यान स्कार्पिओला कव्हर देणारा दुचाकीस्वार मात्र अंधाराचा फायदा उचलत आपले वाहन सोडून जंगलात पसार झाला आहे. स्कार्पिओ चालकास बेड्या ठोकत पथकाने दोन्ही वाहनासह सुमारे ९ लाख ४४ हजार ८० रूपये किमतीचा मद्यसाठा जप्त केला आहे. याप्रकरणी सदर चालकासह दुचाकीस्वार तसेच अज्ञात पुरवठादार खरेदीदार व अन्य व्यक्तीविरोधात दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ड विभागाचे निरीक्षक एम.एच.गोसावी, दुय्यम निरीक्षक आर.एन.सोनार,एस.आर.इंगळे सहाय्यक दुय्यम निरीक्षक हेमंत नेहरे जवान एस.ए.माने, लक्षमीकांत आहिरे,स्वप्निल सुर्यवंशी,उर्वेश देशमुख व वाहनचालक महेश खामकर आदींच्या पथकाने केली.