नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रिक्षा प्रवासात लोकेशन मागविण्याच्या बहाण्याने चालकाचा मोबाईल लांबविणारा भामटा मुंबईनाका पोलीसांच्या हाती लागला आहे. पोलीस तपासात १६ मोबाईल आणि वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरी केल्याची त्याने कबुली दिली आहे. संशयिताच्या ताब्यातून पथकाने ३ लाख ७४ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला असून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी वर्तविली आहे.
नितीन शरद काळे (रा.गाडेकर मळा नाशिकरोड) असे अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्याचे नाव आहे. रविशंकर मार्गावरील हॉटेल जीपीएस ९९ परिसरात एक चोरटा विना नंबर दुचाकीवर मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुबईनाकाचे अंमलदार समीर शेख व राजेंद्र नाकोडे यांना मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.१२) पथकाने सापळा लावला होता. संशयित विनानंबर अॅक्टीव्हावर येताच पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलीस तपासात त्याने ताब्यातील दुचाकी चोरीची असून गेल्या काही दिवसांपासून रिक्षा प्रवासात अनेक चालकाचे मोबाईल पळविल्याची कबुली दिली. कुठे जायचे आहे त्याबाबतचे लोकेशन मागवतो असे सांगून तो चालकाकडून मोबाईल ताब्यात घेवून पोबारा करायचा मुंबई नाका भागात घडलेल्या मोबाईल चोरीत त्यास अटक करण्यात आली असून त्याच्या ताब्यातून १६ मोबाईल व अंबड पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेल्या चार दुचाकी असा सुमारे ३ लाख ७४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे चावी लावलेल्या मोटारसायकली त्याने पळविल्या आहेत. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सुधीर पाटील,सतिष शिरसाठ जमादार रोहिदास सोनार हवालदार देविदास गाढवे,समीर शेख,राजेंद्र नाकोडे,नवनाथ उघले,योगेश अपसुंदे, गणेश बोरणारे,आकाश सोनवणे व दिपक जगदाळे आदींच्या पथकाने केली.