नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सायबर भामट्यांकडून गुंतवणुकीवर अल्पावधीत मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून शहरातील अनेकांना चुना लावला जात आहे. वेगवेगळया भागात राहणा-या महिलेसह एकास असेच आमिष दाखवून भामट्यांनी तब्बल सव्वा कोटी रूपयांना गंडविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीस आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार गेल्या महिन्यात सायबर भामट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधला होता. कॅनयॉन असेटस या नामांकित कंपनीचे संचालक असल्याचे भासवून भामट्यांनी तक्रारास आपल्या जाळयात ओढले. व्हॉटसअप ग्रुपमध्ये समाविष्ट करीत कंपनीस मोठा नफा होत असल्याचे भासविण्यात आले. त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास बसला. तक्रारदार गळाला लागताच त्यांना मोठ्या नफ्याचे आमिष दाखवत संशयितांनी सांगितल्यानुसार बँक खात्यामध्ये पैसे भरण्यास भाग पाडले. या घटनेत तक्रारदाराने १ कोटी १३ लाख १० हजार रूपयांची गुंतवणुक केली मात्र महिना उलटूनही पदरात एक रूपयाही पडला नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदाराने पोलीसात धाव घेतली आहे.
अश्याच प्रकारे अश्विनी सरदेशमुख यांचीही फसवणुक करण्यात आली. अपरस्टॉक्स या नामांकित कंपनीचे बनावट अॅप डाऊनलोड करण्यास सांगून भामट्यांनी त्याद्वारे सरदेशमुख यांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले. सरदेसाई यांनी १५ लाख ८० हजार रूपयांची गुंतवणुक केली मात्र कुठलाही परतावा मिळाला नाही. दोघा गुंतवणुकदारांना भामट्यांनी तब्बल १ कोटी २८ लाख ९० हजार रूपयांना गंडविले असून अधिक तपास अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.