नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- देवदर्शन आटोपून घराकडे जाणा-या वृध्देची वाट अडवित भामट्या तोतया पोलीसांनी सुमारे दीड लाख रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली. ही घटना कलानगर भागात घडली असून, याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगला दगडूदास बैरागी (६९ रा. आंबेश्वरीनगर,निसर्ग नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बैरागी बुधवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास घर परिसरातील महादेव मंदिरात गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून त्या घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्यांची वाट अडवित पोलीस असल्याची बतावणी केली. यावेळी संशयितांनी अंगावरील दागिणे काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने सुमारे १ लाख ४० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत हातोहात लांबविली अधिक तपास उपनिरीक्षक परदेशी करीत आहेत.
चैनस्नॅचिंगच्या दोन घटना
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आडगाव शिवरातील कपालेश्वर नगर आणि बिडीकामगार नगर भागात मंगळवारी (दि.११) रात्रीच्या सुमारास चैनस्नॅचिंगच्या घटना घडल्या. अवघ्या दहा मिनीटाच्या अंतराने घडलेल्या या घटनांमध्ये दुचाकीस्वार भामट्यांनी दोन महिलांच्या गळयातील सुमारे एक लाख रूपये किमतीचे मंगळसुत्र हिसकावून नेले असून याप्रकरणी एकत्रीतरित्या आडगाव पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विठाबाई भिकाजी उगले (६३ रा. इंद्रयणी लॉन्स जवळ कपालेश्वर नगर) या मंगळवारी रात्री जेवण आटोपून फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. रात्री साडे नऊच्या सुमारास त्या चक्कर मारून आपल्या घरी जात असतांना वाटेत दुचाकीवर आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळयातील मंगळसूत्र हिसकावून नेले. दुसरी घटना बिडीकामगारनगर भागात घडली. सुवर्णा खांडरे या मंगळवारी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास घर परिसरातील गंगोत्री गार्डन जवळून पायी जात असतांना दुचाकीवर आलेल्या भामट्यानी त्यांच्या गळयातील सोन्याची पोत हिसकावून नेली. दोन्ही घटनेत भामट्यांनी सुमारे १ लाख ५ हजार रूपये किमतीच्या अलंकारांवर डल्ला मारला असून अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
डॉक्टर महिलेचा लॅपटॉप चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्क केलेल्या कारची काच फोडून डॉक्टर महिलेचा लॅपटॉप चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना खुर्जुल मळा परिसरातील विराजनगर येथे घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ.अनिता काशिनाथ नागरगोजे (रा.उत्तरानगर,तपोवन लिंकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. डॉ. नागरगोजे या गेल्या शुक्रवारी (दि.७) रात्री नाशिकरोड येथील खर्जुळ मळा भागात गेल्या होत्या. विराजनगर येथील गॅलेक्सी स्कूलजवळ पार्क केलेल्या एमएच १२ एक्सई ००८६ या कारची काच फोडून चोरट्यांनी सुमारे ३० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. या घटनेत चोरट्यांनी डॅश बोर्ड कश्याने तरी तोडून नुकसान केले असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.