नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- य म्हसरुळ परिसरात राहणा-या एका दाम्पत्यातील कौटूंबिक कलहातून चिमुकलीच्या मृतदेहाचे हाल झाले. पत्नी माहेरी निघून गेल्याने वडिलांसोबत राहणा-या दीड वर्षीय बालिकेचा खेळता खेळता पडल्याने विहीरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. याबाबत वडिलांनी वाच्यता न करताच म्हसरूळच्या स्मशानात बुजवून टाकत मुलीचे अंत्यसंस्कार उरकून टाकले. दोन दिवसांनी या घटनेची माहिती मिळताच जन्मदेती आईने टाहो फोडत आपल्या पतीनेच मुलीचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केल्याने स्मशानात पुरलेला मृतदेह काढून शवविच्छेदन करण्यात आले.
वैष्णवी विकास वळवी (वय दीड वर्ष) असे मृत बालिकेचे नाव आहे. विद्या व विकास यांचा विवाह सन २०२१ मध्ये झाला आहे. त्यांना दीड वर्षांची वैष्णवी ही मुलगी होती. विवाह झाल्यानंतर विद्या व विकास यांचे कौटुंबिक वाद सुरु झाले. त्यामुळे प्रकरण थेट गंगापूर पोलीस ठाण्यात गेले. तेथे विद्याने पती व इतरांविरोधात पैशांची मागणी व छळवणूकीचा तक्रार नोंदविली. त्यामुळे पती -पत्नी विभक्त राहू लागले. या वादानंतर दीड वर्षीय वैष्णवी वडिल विकास यांच्याकडे होती. दोन दिवसांपूर्वी घराजवळ खेळत असतांना तिचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना निदर्शनास येताच विकासने तिला विहिरीतून पाण्याबाहेर काढत तिच्यावर म्हसरुळ येथील स्मशानभूमीत पुरुन अंत्यसंस्कार केले. या प्रकाराची माहिती वैष्णवीची आई विद्या यांना कळाली. त्यांनी थेट डायल ११२ ला फोन करुन माहिती दिली. ॉ
त्यानंतर, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, म्हसरुळचे वरिष्ठ निरीक्षक अतुल डहाके, उपनिरीक्षक सचिन मंद्रुपकर तसेच वैद्यकीय अधिका-यांचे पथक व नातलग स्मशानभूमीत पोहोचले. जेथे वैष्णवीला पुरण्यात आले, त्या ठिकाणाहून तिचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात दाखल केला. तिचे शवविच्छेदन केले असता, तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. याबाबत म्हसरुळ पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्रकरणात कुठलाही घातपात समोर आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तरी आकस्मिक मृत्यूच्या नोंदीनुसार सखोल तपास केला जाणार आहे.