नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहन खरेदीसाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी छळ करीत २६ वर्षीय विवाहीत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पती मुद्दतसर कादीर शेख, सासू रईसा कादीर शेख, दीर मुस्कीम शेख व नणंद शायना मोसिन शेख व शमिना इलियास सय्यद अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत अन्वरखॉ अकबरखॉ पठाण (रा.खंडाळा ता.वैजापूर जि.छत्रपती संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पठाण यांच्या नसरीन मुद्दसर शेख (२९ रा.भारतनगर,वडाळारोड) या मुलीने गेल्या गेल्या ११ फेब्रुवारी रोडी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. पती मुद्दसर शेख यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले होते.
मुलगी सासरी नांदत असतांना तिचा वाहन खरेदीसाठी माहेरून पैसे आणावेत या मागणीसाठी छळ केला जात होता असा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. सासरच्या मंडळीकडून बारीक सारीक कारणावरून तिचा मानसिक व शारिरीक छळ करण्यात आल्याने अखेर तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मुस्तफा शेख करीत आहेत.