नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावर ठेवणा-या दोघा तडिपारांना मंगळवारी (दि.११) पोलीसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई नाशिकरोड येथील सुभाषरोड व संजय गांधी नगर भागात करण्यात आली. याप्रकरणी नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
निसार उर्फ रईस सलीम पठाण (३६ रा.प्रकाशनगर समानगावरोड) व राहूल उर्फ पाप्या बाबुलाल चाफळकर (२२ रा. संजय गांधी नगर नाशिकरोड) अशी संशयित तडिपार गुंडाची नावे आहेत. संशयितांच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहर व जिह्यातून दोघांना प्रत्येकी दोन वर्ष कालावधीसाठी हद्दपार केलेले असतांनाही ते शहरात मिळून आले.
निसार पठाण मंगळवारी सुभाषरोडवरील रिपोर्ट कॉर्नरचे समोरील पिंपळाच्या झाडाखाली मिळून आला तर पाप्या चाफळकर संजय गांधीनगर भागात राजरोसपणे वावरतांना आढळून आला. याबाबत शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ चे अमलदार शंकर काळे व उपनगरचे अंमलदार अनिल शिंदे यांनी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड व उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अधिक तपास हवालदार गायकवाड व उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.
कोयता घेवून फिरणा-या तरूणावर पोलीसांची कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिडको परिसरात धारदार कोयता घेवून फिरणा-या तरूणावर पोलीसांनी कारवाई केली. संशयिताच्या ताब्यातून धारदार कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोशन सुभाष मुर्तडक (२१ रा.गामणे मळा,मखमलाबादरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कोयताधारीचे नाव आहे. पेलीकन पार्क भागात फिरणाºया तरूणाकडे कोयता असल्याची माहिती अंबड पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी (दि.११) रात्री पथकाने धाव घेत सशयिताच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या अंगझडतीत लोखंडी कोयता मिळून आला असून अधिक तपास पोलीस नाईक जगझाप करीत आहेत.