नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दुचाकीवर ठेवलेली रोकड असलेली हॅण्ड बॅग चोरट्यांनी पळवून नेली. ही घटना पंचवटी कारंजा भागात घडली असून या घटनेत भामट्यांनी सुमारे १ लाख ४० हजाराची रोकड होती. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर राजू सोनवणे (३० रा. देवळाली कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सोनवणे कलेक्शन गोळा करण्याचे काम करतात. सोमवारी (दि.१०) शहरातील विविध भागातील व्यावसायीकांकडून कलेक्शन करून ते पंचवटी कारंजा येथे पोहचले होते. ओमकार इलेक्ट्रॉनिक्स या दुकानातून त्यांनी पैसे घेऊन घराकडे निघाले असता ही घटना घडली. ओमकार इलेक्ट्रॉनिक्सचे मालक विजय राजपूत यांनी त्यांना आवाज दिला. दुकाना समोर पार्क केलेल्या अॅक्टीव्हा ( एमएच १५ जीजी ६८३५) या दुचाकीच्या फुटरेसवर बॅग ठेवून ते राजपूत यांना भेटण्यासाठी गेले असता ही चोरी झाली.
अज्ञात चोरट्यांनी अल्पावधीत पैश्यांची बॅग हातोहात लांबविली. राजपूत यांची भेट घेवून दुचाकीजवळ पोहचलेल्या सोनवणे यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी सर्वत्र शोधाशोध करून पोलीस ठाणे गाठले असून या बॅगेत १ लाख ३९ हजार ८०० रूपयांची रोकड होती. अधिक तपास हवालदार शिंदे करीत आहेत.