नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शहरात तोतया पोलीसांचा सुळसुळाट झाला असून वयोवृध्दांना एकटे गाठून दागिणे हातोहात लांबविले जात आहे. मंगळवारी (दि.११) वेगवेगळया ठिकाणी घडलेल्या तीन घटनांमध्ये भामट्यांनी खून व अन्य कारणांबरोबरच तपासणी करीत असल्याचे भासवून सुमारे साडे चार लाख रूपयांचे अलंकार हातचलाखीने लांबविले. याबाबत म्हसरूळ, मुंबईनाका आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दिंडोरीरोडवरील प्रभात नगर भागात राहणा-या शिल्पा सुरेश मराठे (७२ रा. कृष्ण पुजा टेक्सटाईल्स मागे) यांनी याबाबत पहिली तक्रार दिली. मराठे या मंगळवारी सकाळच्या सुमारास परिसरातील श्री गोंदवलेकर महाराज मंदिरात पायी जात असतांना ही घटना घडली. गंगोत्री बंगल्यासमोरून त्या पायी जात असतांना अज्ञात भामट्याने त्यांना गाठले. पुढे काही लोक उभे आहेत असे सागून त्याने मराठे यांना अंगावरील अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला दिला. मराठे यांनी हातातील बांगड्या व गळयातील बोरमाळ काठून पर्स मध्ये ठेवत असतांना संशयिताने त्यांच्या हातातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची बोरमाळ हिसकावून दुचाकीवर पोबारा केला. याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पटारे करीत आहेत.
दुसरी घटना पखालरोड भागात घडली. अंजना बाबुराव गायकवाड (७५ रा. सौभाग्यनगर लॅमरोड नाशिकरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. गायकवाड मंगळवारी पखालरोड भागात गेल्या होत्या. सुनिल खोडे यांच्या घराजवळील बेकरी शेजारी त्या उभ्या असतांना दुचाकीवरील तीन भामट्यांनी त्यांना गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी या भागात एका वृध्द महिलेचा खून झाला आहे. तुम्ही अंगावरील दागिणे काढून पिशवीत ठेवा असा सल्ला देत भामट्यांनी सुमारे १ लाख ९५ हजार रूपये किमतीचे अलंकार हातोहात लांबविले. त्यात सोन्याच्या बांगड्या व मंगळसुत्राचा समावेश आहे. कागदात बांधून दिलेले अलंकार गायकवाड यांनी घरी जावून बघितले असता ते बनावट असल्याचे समोर आले. याबाबत मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हयाची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
तिसरी घटना वडाळा पाथर्डी रोड भागात घडली. विष्णूसा अर्जुनसा भारद्वाज (७५ रा.वडाळा पाथर्डी रोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. भारद्वाज या मंगळवारी परिसरातील समर्थ नगर येथील रामेश्वर महादेव मंदिरात देवदर्शनासाठी जात असतांना ही घटना घडली. जगन्नाथ चौकातून त्या पायी रामेश्वर मंदिराच्या दिशेने जात असतांना बॉडी सेन्स जीम परिसरात त्यांना डबलसिट आलेल्या दुचाकीस्वारांनी गाठले. पोलीस असल्याची बतावणी करीत भामट्यांनी त्याना अंगावरील दागिणे काढून ठेवण्याचा सल्ला देत हिरेजडीत व एक चांदीची अश्या सुमारे २ लाख एक हजार रूपये किमतीच्या दोन अंगठ्या हातचलाखीने लांबविल्या. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.