नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवत सायबर भामट्यांनी शहरातील दोघांना तब्बल १९ लाख रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. टास्कची ऑर्डरपूर्ण करण्याच्या नादात हा गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुक व आयटीअॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहितीनुसार शहरातील दोघांशी भामट्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधला होता. ९ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान भामट्यांनी ८२६३०७८४९० व ७३६७०५५७४० या क्रमांकावरून संपर्क साधात पार्ट टाईमचे नोकरीचे आमिष दाखविले. वेगवेगळया ग्रुपमध्ये समाविष्ट करीत दोघांना सोशल साईटवरून चॅटींग करीत टास्क देण्यात आला. हा टास्क पूर्ण करण्यासाठी तक्रारदार यांनी ११ लाख ८६ हजार ६८८ तर अन्य दुस-याने ६ लाख ९७ हजार २२२ रूपये गुंतवणुक केली.
या रकमा संबधीतांनी सांगितल्यानुसार विविध बँक खात्यात व युपीआयच्या माध्यमातून भरण्यास भाग पाडण्यात आल्या. महिना उलटूनही पदरात काही न पडल्याने तक्रारदारांनी पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे करीत आहेत.