नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- दरोडा, जबरीचोरी आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न अशा पाच गुन्हयात गुंगारा देणा-या म्हस्के गँगच्या म्होरक्यास पोलीसांनी बेड्या ठोकल्या. शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने सगमनेर शहरातील गुंजाळवाडी नगर भागात त्यास मोठ्या शिताफीने जेरबंद केले असून त्यास उपनगर पोलीसांच्या स्वाधिन करण्यात आले आहे.
सागर उर्फ सोनू सुरेश म्हस्के (२९, रा. भालेराव मळा, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे संशयित म्होरक्याचे नाव आहे. गेल्या २३ नोव्हेंबर रोजी रात्री जयभवानी रोडवरील शकुंतला पेट्रोलपंप परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पोलीसांनी बेड्या ठोकल्या. संशयितांच्या ताब्यातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, कोयता, दोर, मिरची पूड असा ऐवज जप्त करण्यात आला होता. या कारवाईत मात्र अंधाराचा फायदा घेत संशयित म्होरक्या पसार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना पथकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संशयित संगमनेर (जि. अहिल्यानगर) शहरात दडून बसल्याची माहिती मिळताच पथक रवाना झाले होते. संशयिताचा कुठलाही ठावठिकाणा माहीत नसताना पथकाने मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच स्थानिकच्या मदतीने त्यास हुडकून काढले.
गुंजाळवाडीतील लक्ष्मीनगर भागात संशयितास बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याच्या विरोधात उपनगर व देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, सुनील आडके, प्रवीण चव्हाण, अशोक आघाव, सुनिता कवडे आदींच्या पथकाने केली.