नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्याने एका वृध्दाचे ४० हजार रूपये लांबविले. पैसे काढतांना मदतीचा बहाणा करून भामट्याने एटीएम कार्ड लाबविले होते. या कार्डच्या माध्यमातून परस्पर पैसे काढण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारत मुरलीधर वाघामारे (६१ रा.दत्तनगर पेठरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. वाघमारे शनिवारी (दि.८) सायंकाळी पैसे काढण्यासाठी दिंडोरीरोड भागात गेले होते. चित्रकुट सोसायटीतील एसबीआय बँकेच्या एटीएम बुथमध्ये गेले होते. पैसे काढत असतांना अंधार असल्याने एकाने त्यांना मदतीचा हात दिला. यावेळी पैसे काढून देण्याचा बहाणा करीत हातचलाखीने भामट्याने एटीएमकार्डची आदलाबदल केली. त्यानंतर भामट्याने एटीएम कार्डचा वापर करीत अन्य बुथमधून ४० हजाराची रक्कम परस्पर काढून घेतली असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बापू रायकर करीत आहेत.
………
बस प्रवासात वृध्देच्या पिशवीतील पाकिट चोरले…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बस प्रवासात भामट्यांनी वृध्देच्या पिशवीतील पाकिट चोरून नेले. या पाकिटात सोन्याचांदीचे दागिणे व बाराशे रूपयांची रोकड असा सुमारे ९१ हजार २०० रूपयांचा ऐवज होता. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरा दत्तात्रेय आहेर (६४ रा.जत्रा नांदूर लिंकरोड वृंदावननगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आहेर दुगाव ता.चांदवड येथे गेल्या होत्या. रविवारी (दि.९) दुपारच्या सुमारास त्या मनमाड डेपोच्या बसमधून प्रवास करीत असतांना ही चोरी झाली. दुगाव येथून त्या मनमाड नाशिक बसमध्ये बसल्या होत्या.
बसमधील गर्दीची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील पाकिट हातोहात लांबविले. या पर्स मध्ये बाराशे रूपयांची रोकड व सोन्याचे मंगळसुत्र असा सुमारे ९१ हजार २०० रूपयांचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार बनकर करीत आहेत.