नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– लोखंडी पाईपाचा धाक दाखवित दोघानी फॅब्रीकेशन व्यावसायीकास लुटल्याची घटना औद्योगीक वसाहतीत घडली. या घटनेत शिवीगाळ व दमदाटी करीत व्यावसायीकाच्या खिशातील ४० हजाराची रोकड बळबजबरीने काढून घेत भामट्यांनी पोबारा केला होता. मात्र पोलीसांनी त्यांना हुडकून काढले असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शशी सुरेशसिंग उर्फ शशी राजपूत (३८) व अमोल विष्णू फुलावरे (२३ रा. घरकुल योजना चुंचाळे) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत हरकु महेश्वर यादव (रा.दातीरनगर,अंबड ) यांनी फिर्याद दिली आहे. यादव फेब्रीकेशन व्यावसायीक असून त्यांचा अंबड एमआयडीसीत एच.वाय इंजिनिअरींग नावाचा वर्कशॉप आहे. यादव रविवारी (दि.९) रात्री आपले वर्कशॉप बंद करून घराकडे निघाले असता ही घटना घडली.
वर्क शॉफ समोरील दोघा भामट्यांनी त्यांना गाठून शिवीगाळ केली. यावेळी एकाने शर्टची कॉलर पकडीत कायरे तुला जास्त माज आला आहे का ? तू मला ओळखत नाही का असे म्हणत दमदाटी केली. तर दुस-याने लोखंडी पाईपाचा धाक दाखवित तुझ्याकडील पैसे काढून दे नाही तर गेमच करतो असे म्हणत त्यांच्या खिशातील ४० हजाराची रोकड बळजबरीने काढून घेतली. दोघांनी पोबारा केल्यानंतर भेदरलेल्या यादव यांनी तात्काळ पोलीसांशी संपर्क साधल्याने दोघा लुटारूंना बेड्या ठोकण्यात आल्या असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मुगले करीत आहेत.