नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- प्रादेशिक परिवहन विभागात सब इनस्पेक्टर पदावर नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने भामट्यांनी शहरातील एका बेरोजगारास तब्बल २४ लाख २० हजार रूपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने बेरोजगाराने तगादा लावला असता संशयितांनी बनावट मेलवरून खोटे नियुक्तीपत्र पाठवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास ठाकूर, छगन अग्रवाल, पवन भुतडा व उज्वला वठारक अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजांची नावे आहेत. याबाबत पुंजाबा नामदेव सोनवणे (रा.समुद्रनगर,सातपूर) यांनी फिर्याद दिली आहे. सोनवणे यांची २०२० मध्ये संशयितांची भेट झाली होती. यावेळी भामट्यांनी सोनवणे यांचा विश्वास संपादन करीत त्यांचा बेरोजगार मुलगा वैभव सोनवणे यास आरटीओ मध्ये सब इनस्पेक्टर या पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र यापोटी रोकड मागण्यात आल्याने सोनवणे यांनी अल्पावधीत पैशांची तरतुद केली. रोख व ऑनलाईन पध्दतीने तब्बल २४ लाख २० हजाराची रक्कम संशयितांच्या स्वाधिन करण्यात आली. मात्र पाच वर्ष उलटूनही नोकरी लागली नाही.
त्यामुळे सोनवणे बापलेकाने पैशांसाठी तगादा लावला असता संशयितांनी नामी शक्कल लढवित वैभव सोनवणे याच्या नावाने आरटीओ कार्यालयात सब इन्स्पेकर या पदावर निवड झाल्याबाबत बनावट मेल धाडला. या नियुक्ती पत्राच्या आधारे सोनवणे बापलेकाने चौकशी केली असता सदरचे नियुक्तीपत्र बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे बापलेकाने पोलीसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक संदिप शेवाळे करीत आहेत.