नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रवी शंकर मार्ग भागात पाठलाग करून अनोळखी दुकलीने एका दुचाकीस्वारावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत हेल्मेटमुळे दुध डेअरीवर काम करणारा दुचाकीस्वार कामगार बालंबाल बचावला असला तरी त्याच्या हातावर व पाठीवर वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेच्या आधारे हल्लेखोराचा शोध घेत आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार महेश पुंडलिक गुंजाळ (३१ रा.लालबाग चौक,चेतनानगर) या युवकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गुंजाळ निलगिरी बाग भागातील डेरी पॉवर या दुध डेअरीवर कामास असून, शुक्रवारी (दि.६) पहाटे नेहमीप्रमाणे दुचाकीवर कामावर जात असतांना हा हल्ला झाला. रवी शंकर मार्गावरून पहाटे चार वाजेच्या सुमारास तो प्रवास करीत असतांना मोटारसायकलवर डबलसिट आलेल्या दोघांनी त्याचा पाठलाग केला. प्रेमसागर स्विट तसेच हॉटेल जीपीएस ९९ या मार्गे चकवा देत त्यांनी फेम सिग्नल कडे जाणारा मार्ग पकडला असता संशयित दुचाकीस्वार त्याच्या पाठीशी आले. त्यामुळे गुंजाळ यांनी प्रसंगावधान राखत लुटमारीचा संभाव्य धोका ओळखून पलायन करण्याचा प्रयत्न केला असता पाठीमागून आलेल्या भामट्यांनी त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
हेल्मेट परिधान केलेले असल्याने त्यांना इजा झाली नाही. गुंजाळ थांबत नसल्याचे बघून संशयितांनी पुन्हा त्यांच्या पाठीवर व हातावर वार केला परंतू तरीही गुंजाळ यानी न थांबता आपले वाहन दामटल्याने ते बालंबाल बचावले असून लुटारूंनी माघारी फिरत पोबारा केला आहे. पोलीसांनी या घटनेची गंभीर दखल घेत परिसरातील सीसीटिव्ही यंत्रणेचे पाहणी सुरू केली असून लवकरच संशयित दुचाकीस्वार पोलीसांच्या हाती लागतील असा विश्वास वर्तविण्यात येत आहे. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक संतोष नरूटे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार भगवान भोये करीत आहेत.