नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– वडिलांशी झालेल्या वादाच्या रागातून टोळक्याने एका व्यावसायीक तरूणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना गणेशवाडीत घडली. या घटनेत युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकिय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुबोध गोडके व त्याचे दोन साथीदार असे व्यावसायीक तरूणावर हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत शुभम युवराज देवरे (२५ रा.मराठा नगर नांदूरगाव) या व्यावसायीकाने फिर्याद दिली आहे. देवरे कुटूंबियांचा गणेशवाडी येथील गौरव अपार्टमेंटच्या एका गाळयात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. रविवारी (दि.९) सायंकाळी शुभम देवरे हा युवक आपला व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. वडापाव दुकानावर काम करीत असतांना परिचीत असलेला घोडके व त्याचे दोन साथीदार तेथे आले.
वडिलांबरोबर झालेल्या जुन्या वादाची कुरापत काढून त्रिकुटाने शुभम देवरे या युवकास लाथाबुक्यांनी मारहाण केली. यावेळी एकाने पाठीमागून येवून धारदार हल्ला केल्याने शुभम जखमी झाला असून नजीकच्या खासगी रूग्णालयात प्रथमोपचार करून त्यास जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. अधिक तपास हवालदार संदिप गांगुर्डे करीत आहेत.