नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भागीदारीतील व्यावसायीक लोभातून एकाने आपल्या मित्राला साडे सात लाख रूपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. वर्ष उलटूनही गुंतवणुकीसह भागीदारीतील नफा न मिळाल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रितेश केदार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे. याबाबत पंकज किशोर बोरसे (२६ रा.विठ्ठलनगर,कामटवाडे) या युवकाने फिर्याद दिली आहे.
बोरसे व संशयित केदार हे एकमेकांचे मित्र असून ग्रीन चिली व्यापारात मोठी कमाई असल्याची बतावणी करीत ही फसवणुक करण्यात आली आहे. भागीदारीत व्यवसाय सुरू करण्याचे आमिष दाखवून केदार याने बोरसे यांचा विश्वास संपादन केला. या व्यवसायाच्या भागभांडवालासाठी बोरसे यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात केदार याच्या वेगवेगळया बँक खात्यावर ७ लाख ६६ हजार रूपयांची रक्कम अदा केली.
मात्र वर्ष उलटूनही गुंतवणुकीसह भागीदारीतील नफ्यातून एक रूपयाही पदरात न पडल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून संशयिताने रकमेचा परस्पर् अपहार केल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली आहे. अधिक तपास निरीक्षक शिरसाठ करीत आहेत.
………
चोरट्यांनी बॅग चोरून नेली
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- उघड्या घरात शिरून चोरट्यांनी बॅग चोरून नेली. या बॅगेत ७५ हजाराच्या रोकडसह दोन मोबाईल असा ९६ हजाराचा ऐवज होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक गणपत शिरोडे (५७ रा. संजीवनगर,अंबड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शिरोडे कुटुंबिय रविवारी (दि.९) सकाळी आपआपल्या कामात व्यस्त असतांना ही घटना घडली. उघड्या घरात शिरून भामट्यांनी टेबलावर ठेवलेली बॅग चोरून नेली. या बॅगेत ७५ हजाराची रोकड व दोन मोबाईल असा सुमारे ९५ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज होता अधिक तपास हवालदार झोले करीत आहेत.