नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- रस्त्यावर मदत करणे एका युवकास चांगलेच महागात पडले आहे. कॉल करण्याच्या बहाण्याने घेतलेला मोबाईल भामट्यांनी पळवून नेला. ही घटना जेलरोड भागातील इंदिरा गांधी पुतळा भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिकेत नितीन बनकर (२३ रा. कृष्णा आईस्क्रीम समोर,दसक) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. बनकर गुरूवरी (दि.६) दुपारच्या सुमारास इंदिरा गांधी पुतळा भागात गेला होता. अभिनव शाळेजवळून तो पायी जात असतांना दोघा अनोळखी भामट्यांनी त्यास गाठले. यावेळी एक अर्जेट कॉल करायचा आहे असा बहाणा करून भामट्यांनी बनकर याचा मोबाईल आपल्या ताब्यात घेतला. फोन वर बोलत असल्याचे भासवून भामट्यांनी बनकर याचा मोबाईल घेवून पोबारा केला असून अधिक तपास हवालदार लखन करीत आहेत.
सातपूरमध्ये दोन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सातपूर परिसरात राहणा-या दोघांनी रविवारी (दि.९) गळफास लावून घेत आत्महत्या केली. त्यात एका २९ वर्षीय युवकासह ४९ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. याप्रकरणी गंगापूर आणि सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
आकाश रामचंद्र गायकवाड (२९ रा.हनुमान मंदिरामापुढे धर्माजी कॉलनी) असे मृत युवकाचे नाव आहे. गायकवाड याने रविवारी दुपारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये पंख्याच्या हुकास दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबियांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार हिंडे करीत आहेत.
दुसरी घटना त्रिरश्मी बुध्दविहार भागात घडली. सौदांजी तुळशीराम वावर (४९ रा.त्रिरश्मी बुध्दविहार जवळ,एमआयडीसी) यांनी शनिवारी रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बाथरूममध्ये लोखंडी अँगलला साडी बांधून गळफास लावून घेतला होता. मुलगा विशाल वावळ याने त्यांना तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वी वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार केदारे करीत आहेत.