नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वाहतूक नियमांचे उलंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई करीत असतांना कारचालकाने पोलीस कर्मचा-याशी हुज्जत घातल्याचा प्रकार वर्दळीच्या मेहर सिग्नलवर घडला. ई चलान मशिन हिसकावून घेत कारचालकाने थेट नोकरीवर गंडातर आणण्याची भाषा वापरल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक शाखेचे हवालदार अरूण विश्राम चव्हाण यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाण रविवारी (दि.९) दुपारच्या सुमारास मेहर सिग्नल रिक्षा थांबा भागात सेवा बजावत असतांना एमजी रोडकडून सीबीएसच्या दिशेने वळण घेणारा कारचालक मोबाईलवर बोलतांना त्यांना दिसला. हवालदार चव्हाण यांनी एमएच १५ बीएन ४९४८ ही कार अडवून कारवाईचा बडगा उगारला असता ही घटना घडली.
ई चलान मशिनच्या माध्यमातून चव्हाण यांनी कारचा फोटो काढला असता चालकाने त्यांच्याशी वाद घातला. यावेळी त्याने दंडात्मक कारवाईस विरोध करीत चव्हाण यांच्या हातातील ई चलान मशिन हिसकावून घेतले. यावेळी त्याने फोटो डिलेट करण्याचा प्रयत्न करून तू व तुझ्या सारखे दहा पोलीस घरी बसवेल अशी धमकी देत पोबारा केला. अधिक तपास उपनिरीक्षक उमाप करीत आहेत.