नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कपडे काढून धिंड काढण्याची धमकी देत नातेवाईकांनी एका महिलेस ट्रॅक्टर अंगावर घालून जीव ठार मारण्याचा प्रयत्न करीत विनयभंग केल्याचा प्रकार शिलापूर (ता.जि.नाशिक) येथे घडला. न्यायालयाच्या आदेशाने हा प्रकार पोलीसात पोहचला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार वसंत कोंडाजी कहांडळ, प्रकाश जगन्नाथ कहांडळ,भानुदास जगन्नाथ कहांडळ,भास्कर जगन्नाथ कहांडळ व विश्राम कोंडाजी कहांडळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे. शिलापूर शिवारातील गट नं. १६ व १७ मध्ये गेल्या २९ मे २०२३ रोजी ही घटना घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार संशयित तिचे नातेवाईक असून २९ मे रोजी ती आपल्या शेतात काम करीत असतांना संशयितांनी तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने आपला जीव वाचविण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी तिला कपडे काढून धिंड काढण्याची धमकी दिली.
यावेळी प्रकाश कहांडळ याने तिचा विनयभंग केला. याबाबत पोलीसांचे उंबरठे झिजवूनही न्याय न मिळाल्याने पीडितेने कोर्टात धाव घेतली होती. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक भगवंत घोडे करीत आहेत.