नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– कारखान्यासमोर लावलेला कामगार संघटनेचा बोर्ड काढण्याच्या वादातून उद्योजकाकडे दरमहा अडीच लाख रूपयांची खंडणी मागण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर गायधनी, मनोज बोराडे, पंकज सोनवणे, किशोरभाऊ बरू, जीवन दिघोळे व अन्य अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत राधेश्याम रमेश नंदनवार (रा.सहकार कॉलनी,शिवाजीनगर ) यांनी फिर्याद दिली आहे. नंदनवार अंबड औद्योगीक वसाहतीतील युके मेटल इंडस्ट्रीज या कंनीचे कामकाज बघतात.
शुक्रवारी (दि.७) सायंकाळी संशयितांनी अचानक युनियनची स्थापना केली. गैरकायद्याची मंडळी जमवीत संशयितांनी विनापरवानगी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर भारतीय मराठा सेवा संघ प्रणीत कामगार संघटना असा बोर्ड लावला. नंदनवार यांनी समजून सांगत युनियनचा बोर्ड लावण्यास मनाई केली असता संबधीतांनी बोर्ड काढण्याच्या मोबदल्यात २५० कामगारांमागे प्रत्येकी एक हजार याप्रमाणे दरमहा अडिच लाख रूपयांच्या खंडणीची मागणी केली. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भांडे करीत आहेत.