नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– शालकास रेल्वेत नोकरी लावून देण्याचा बहाणा करून भामट्यांनी एकास १४ लाखास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. औषधोपचारासाठी काही रक्कम घेत भामट्यांनी ही फसवणुक केली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल गांगुर्डे, सुधीर गांगुर्डे व निलम गांगुर्डे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताची नावे आहेत. याबाबत सुनील शंकर कदम (रा. सिरीन मेडोज, गंगापूर रोड) यांनी फिर्याद दिली आहे. गांगुर्डे व कदम कुटूंबिय एकमेकांचे परिचीत आहे. गांगुर्डे कुटूंबियाने २०२२ मध्ये कदम यांच्याकडून आजारपणातील औषधोपचारासाठी सात लाख रूपये हातउसनवार घेतले होते. बरेच दिवस उलटूनही पैसे परत न केल्याने कदम यांनी तगादा लावला असता संशयितांनी त्यांचा विश्वास संपादन करीत शालक निशांत तायडे यास रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले.
या मोबदल्यात पुन्हा कदम यांच्याकडून सात लाख रूपये घेतले. मात्र नोकरी लागली नाही. वर्ष उलटूनही नोकरी न लागल्याने कदम यांनी पैश्यांची मागणी केली असता गांगुर्डे कुटुंबियांनी त्यांना टोलवाटोलवी केल्याने हा प्रकार पोलीसात पोहचला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
……..