नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत एकाने महिलेकडे पन्नास लाख रूपयांची खंडणी मागीतल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस आयुक्तालय परिसरात हा प्रकार घडला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळासाहेब दत्तात्रेय भोर (५० रा.राजपाल कॉलनी,मखमलाबादनाका ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत महात्मानगर भागात राहणा-या एका महिलेने फिर्याद दिली आहे. संशयित व महिला यांच्यात आर्थीक वाद असल्याचे कळते. २०१७ पासून संशयित महिलेस त्रास देत असून त्याने वेगवेगळया कार्यालयात महिलेविरोधात खोट्या तक्रारी दिल्या आहेत.
शुक्रवारी (दि.७) महिला जबाब नोंदविण्यासाठी पोलीस आयुक्तालय भागात आली असता ही घटना घडली. संशयिताने आयुक्तालयापासून काही अंतरावर महिलेची वाट अडवित तिच्यावर बंद कंपनीत बलात्कार करण्याची धमकी दिली. यावेळी त्याने पन्नास लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करीत दहा वर्ष शिक्षा असलेल्या खोट्या गुह्यात अडकविण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक टिपरे करीत आहेत.