नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- वारस हक्कानुसार मदत न केल्याने ५४ वर्षी व्यक्तीने आत्महत्या केल्याची प्रकार समोर आला आहे. महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात मृताचे भाऊ आई आणि चुलत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संजय पुरूषोत्तम रत्नपारखी,योगेश पुरूषोत्तम रत्नपारखी,शालिनी पुरूषोत्तम रत्नपारखी व विजय मोहिनीराज कुलकर्णी – रत्नपारखी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून संजय,योगेश व शालिनी हे मायलेक मृताची आई व भाऊ असून विजय कुलकर्णी हे चुलते आहेत. याबाबत. स्वाती संदिप रत्नपारखी (४७ रा.कलावतीआई मंदिरासमोर आदर्शनगर,रामवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. स्वाती रत्नपारखी यांचे पती संदिप पुरूषोत्तम रत्नपारखी (५४) यांनी गेल्या सोमवारी (दि.३) परिसरातील कोशिरे मळा भागात आत्महत्या केली.
या आत्महत्येस संदिप रत्नपारखी यांची आई भाऊ आणि चुलते जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संदिप काही दिवसांपूर्वी वडिलोपार्जीत मालमत्तेत वारसदार असल्याने मदत मागण्यासाठी आपल्या कुटुंबियाकडे गेले होते. मात्र संबधीतांनी त्यास मदत केली नाही. त्यामुळे त्यांनी नैराश्येत टोकाचे पाऊल उचलल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे. अधिक तपास उपनिरीक्षक सचिन चव्हाण करीत आहेत.