नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मृत लष्करी अधिका-याचा भूखंड परस्पर विक्री केल्याचा प्रकार पुढे आला आहे. बनावट कागदपत्राच्या आधारे भामट्यांनी हा उद्योग केला असून, याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय शिवाजी कंकाळ व त्याचे साथीदार अशी संशयितांची नावे आहेत. याबाबत विनायक बंकीम परिडा (रा. कटक, ओडिशा) यांनी फिर्याद दिली आहे. परिंडा यांचे वडिल बंकीम बिहारी परिडा हे लष्करी दलात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत होते. सेवेत असताना त्यांनी पाथर्डी शिवारात सर्व्हे नं. २०३ मधील प्लॉट नंबर ११हा ३६० चौमी प्लॉट खरेदी केला होता.
२२ जानेवारी २०११ मध्ये त्यांचे निधन झाल्याने कुटुंबिय आपल्या राज्यात स्थलांतरीत झाले असता हा प्रकार घडला. संशयित व त्याच्या साथीदाराने बनावट कागदपत्राच्या आधारे सदर प्लॉट परस्पर विक्री केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले असून अधिक तपास उपनिरीक्षक पवार करीत आहेत.